एमजीएम’ मध्ये जेएनईसी ‘राजमताझ २०२३’ स्नेहसंमेलनाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, दि. १५ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजचे बहुचर्चित स्नेहसंमेलन ‘राजमताझ – २०२३’ चे आयोजन दिनांक १६ मार्च २०२३ ते १८ मार्च २०२३ दरम्यान होत आहे. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन १६ तारखेला सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
एमजीएमच्या सर्वंकष विद्यार्थी विकासाच्या कटिबद्धेतून जेएनईसी अभ्यासासोबतच अभ्यासपूरक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांची जी एक आगळीवेगळी संस्कृती बनली आहे त्याचा मानबिंदू म्हणजेच ‘राजमताझ’ मानले जाते. गेल्या दोन वर्षात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘राजमताझ’चे मर्यादित स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. ३८ वर्षाची परंपरा जपत यंदा उत्साहपूर्ण वातावरणात याचे आयोजन करण्यात आले आहे.
राजमताझ’च्या परंपरेनुसार प्रमुख पाहुणे म्हणून दरवर्षी जेएनईसीच्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले जाते. या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून हैदराबाद येथील प्रतिथयश कनेरिका इनकॉर्पोरेशन कंपनीच्या संस्थापक व प्रमुख संचालन अधिकारी श्रीमती समिधा गरुड तर प्रमुख उपस्थिती विप्रो लिमिटेडचे तंत्रज्ञान उपयोजन व वापर विभागाचे जागतिक प्रमुख प्रसाद रामदासी यांची असणार आहे. स्नेहसंमेलनासाठी कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
राजमताझ’च्या निमित्ताने विविध कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नजराना, डिपार्टमेंट ॲट अ ग्लांस, फन गेम्स, कल्चरल नाईट, डीजे नाईट, भरारी, मुशायरा, कला प्रदर्शन आदि कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या वार्षिक सोहळ्यात सर्व विद्यार्थी, पालक, मान्यवर शहरातील रहिवासी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.हरीरंग शिंदे, उपप्राचार्या डॉ. विजया मुसांडे, प्रा.डॉ.नितीन फाफट, प्राध्यापक, रोहित बिडवे, साई प्रसाद मुंडे यांनी केले आहे.
