एमजीएम विद्यापीठाची देशात शैक्षणिक परिवर्तन घडवण्याच्या वाटेवर वाटचाल
एमजीएम विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्धापन दिन समारंभात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांचे प्रतिपादन
नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठात त्याकाळी दिले जाणारे शिक्षण हे नव्या शैक्षणिक धोरणाचे मूळ आहे. एमजीएम विद्यापीठात गुणवत्ता असून ती विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण कामगिरीतून दिसून येते. एमजीएम विद्यापीठ हे देशात शैक्षणिक परिवर्तन घडवण्याच्या वाटेवर योग्यप्रकारे वाटचाल करत आहे, अशी भावना मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी व्यक्त केली. ते एमजीएम विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्धापन दिन समारंभात बोलत होते.
यावेळी या वेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, विश्वस्त प्रतापराव बोराडे, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांची उपस्थिती होती. तर, अशोक पाटील, भाऊसाहेब राजळे, रणजित कक्कड, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. सारिका गाडेकर, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख अतिथी डॉ. राजन वेळूकर म्हणाले, प्राण्यांच्या आयुष्यापेक्षा मानवी आयुष्य जास्त असते पण एखाद्या विद्यापीठाचे आयुष्य ही मानवी आयुष्यापेक्षाही जास्त म्हणजेच शतकानुशतके असते. एमजीएम विद्यापीठाचा असाच शतकानुशतके नावलौकिक करायचा असेल तर त्याची पायाभरणी आतापासूनच करावी लागेल. एखाद्या विद्यापीठाची तीन वर्षांची कारकीर्द म्हणजे सुरुवातच असते. पण, सुरुवातीच्या काळातच दर्जा आणि गुणवत्ता वाढीचे कार्य विद्यापीठाला खूप पुढे घेऊन जाते. तंत्रज्ञान आपल्याला शक्ती देते पण ते कसे वापरावे, हे सांगत नाही. तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जाणार ही बाब निरर्थक आहे. याऊलट तंत्रज्ञानामुळे नव्या आणि भरमसाठ रोजगाराची निर्मिती होऊ शकते. त्यासाठी आवश्यक कौशल्ये अवगत केल्यास या नव्या रोजगारात आपले स्थान नक्कीच असेल. सध्या जगाची लोकसंख्या 750 कोटींनी वाढलेली आहे. त्यामुळे स्पर्धाही वाढली आहे. सध्या आपण शिकत असलेल्या ज्ञानाकडे भविष्याच्या दृष्टीने बघण्याची गरज आहे. 1983 पूर्वी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीमध्ये कित्येकांना संधी नव्हती. पण, चौथी उत्तीर्ण असलेले तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी खाजगी अभियांत्रिकी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि सर्वसामान्यांचे शिक्षणाचे दार खुले झाले. आताच्या युवा पिढीने केलेल्या कामावर पुढची पिढी उभी राहणार आहे आणि पुढच्या पिढी तुमच्या आताच्या कामावरच आपले मूल्यमापन करतील. आपण करत असलेल्या संशोधनातून आपण किती लोकांचे कल्याण करू शकतो, हे बघितले पाहिजे. सध्या केवळ बेस्ट प्रॅक्टिसेस नव्हे तर नेक्स्ट प्रॅक्टिसेसची गरज आहे. सर्वांनाच नोकरी मिळणे शक्य नाही पण रोजगार सर्वांना मिळू शकतो. आता शिक्षकांनी शिकवायला नको तर शैक्षणिक वातावरण तयार करता येईल, अशा शिक्षण पद्धतीचा वापर करावा लागेल. आता शिक्षकांनी शिकवू नये तर विद्यार्थ्यांना शिकू दयावे, अशी अपेक्षाही डॉ. वेळुकर यांनी या वेळी व्यक्त केली.
एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ म्हणाले, एमजीएम विद्यापीठाचा हा प्रवास नवनवे व्हिजन घेऊन सुरू आहे. पुढील वर्षात एनआयआरएफ रँकिंगमध्ये महत्वाचे स्थान मिळवणे आणि एमजीएमला नेक्स्ट जनरेशन युनिव्हर्सिटी बनवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. कमीत कमी क्लासरूम शिक्षण देत विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवातून समृद्ध करणाऱ्या शिक्षण पद्धतीचा अधिकाधिक अवलंब करण्याकडे कल असेल. रिसर्च चेअरच्या माध्यमातून विविध विद्याशाखांतील ज्ञानांना एकत्रित आणून नवसंशोधनास बळ देण्याची विद्यापीठाची भूमिका आहे. सध्या विद्यापीठाने अनेक नवनवे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत आणि आगामी काळात विद्यापीठाला आणखी दर्जेदार बनवण्याचा सर्वांचा प्रयत्न राहील, असेही कुलगुरू या वेळी म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, या जगात शाश्वत असलेल्या गोष्टी कधीच बदलणार नाहीत आणि त्याची आपल्याला जाणीव असायला हवी. ‘अप्पो दीपो भव’ हे एमजीएम विद्यापीठाचे बोधवाक्य आहे. भगवान गौतम बुद्धांची शिकवण आहे की, कुणीच कुणाला मार्ग दाखवू शकणार नाही अर्थात स्वयं प्रकाशित व्हायला हवे. वर्तमानात असलेल्या क्षणावरच आपला अधिकार आहे. त्यामुळे या क्षणात तुम्ही जे काही पेराल तेच उगवेल. आता प्रत्येक क्षेत्रात काय सुरू आहे, हे आपल्याला प्रत्येकालाच माहित असायला हवे, इतक्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. एमजीएम विद्यापीठ हे नुकतेच जन्माला आले आहे. त्यामुळे आगामी काळात विद्यापीठ भरारी घेईल, अशी अपेक्षाही कुलपतींनी यावेळी व्यक्त केली. कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या कामगिरीचा आणि वाटचालीचा आढावा मांडला. प्रा. सरफराज अली कादरी यांनी सूत्रसंचालन आणि प्रा. डॉ.परमिंदर कौर यांनी आभार मानले.
एमजीएम विद्यापीठ वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचा शुभारंभ
एमजीएम विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते विविध उपक्रमांचा शुभारंभही करण्यात आला. चिंतनगाह परिसरात ध्वजारोहण आणि विद्यापीठ गीतगायन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर रुक्मिणी सभागृहात पार पडलेल्या मुख्य समारंभात एमजीएम विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना तसेच एनसीसी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जर्नल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, रिसर्च ऑफ मॅनेजमेंट, मीडिया मेसेंजर या संशोधन नियतकालिकांचे प्रकाशन तसेच एमजीएम रिसर्च चेअरचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.