Happy Independence Day 2022

जगाला सामर्थ्यशाली बनवण्याची भारतात क्षमता: कुलगुरू डॉ. विलास सपकाळ
दिमाखदार पथसंचलन आणि विविध सादरीकरणाच्या माध्यमातून एमजीएममध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा
भारताचा 25 वर्षांच्या टप्प्यात विकास बघितला तर सुरुवातीच्या 25 वर्षात भारताने आपले सामर्थ्य ओळखुन मनुष्यबळ निर्मिती, शिक्षण आणि आरोग्य यावर भर दिला. दुसऱ्या 25 वर्षात याच सामर्थ्याच्या बळावर हरित, अवकाश आणि तंत्रज्ञानात भरारी घेतली आणि तिसऱ्या 25 वर्षात भारत अन्न, ऊर्जा आदी क्षेत्रात प्रबळ होऊन जगाला भारतीय मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि संशोधनाने बळकट केले आहे. आज आपण स्वयंपूर्ण तर आहोतच पण आपल्या समर्थ्यामुळे जगालाही सामर्थ्यशाली केले आहे, अशी भावना एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी व्यक्त केली.
महात्मा गांधी मिशनच्या वतीने एमजीएम स्टेडियमवर आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, अनुराधाताई कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, काशी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.बी.बी.ओझा, रचना सपकाळ, डॉ. गिरीश गाडेकर, डॉ.क्षितिजा गाडेकर, कुलसचिव आशिष गाडेकर, डॉ.सारिका गाडेकर आदी उपस्थित होते.
डॉ.सपकाळ पुढे म्हणाले, नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या क्रीडापटूंनी आपल्या दर्जेदार कामगिरीने सामर्थ्य सिद्ध केले. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान केले ते ज्ञात ठेऊन जगाच्या कल्याणासाठी आपण सामर्थ्य प्राप्त केले पाहिजे. आज भारत श्रेष्ठ आणि सामर्थ्यशाली देश असून जगाला समर्थ बनवण्याची क्षमता या देशात आहे. पुढील पिढ्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रतिभासंपन्न होत सर्वांचे कल्याण करावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, महात्मा गांधी मिशनअंतर्गत कार्यरत सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी परेड कमांडर आणि जेएनइसीचा विद्यार्थी जावेद खानच्या नेतृत्वात आणि कॅप्टन आर.के.दानवे यांच्या मार्गदर्शनात दिमाखदार आणि शिस्तबद्ध पथसंचलन केले. एमजीएम संस्कार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बँडवादन तसेच एमजीएमच्या संगीत विभागाने ‘वृंदगान’ अंतर्गत देशभक्तीपर रचना तसेच सर्वधर्म प्रार्थना सादर केली
यावेळी ‘गवाक्ष’ या ग्रुहपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. ‘रक्तदान हेच जीवदान’ या संकल्पनेवर एमजीएम वैद्यकीय रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत रक्तदानाविषयी जनजागृती केली. तर, आपल्या वैयक्तिक आयुष्यात आजवर किमान 50 ते 75 वेळा रक्तदान करणारे अभिजित कुलकर्णी, राजेंद्र राठोड, ऍड.अहमद सिद्दीकी, अभिषेक कंदवाल, अमित जालनावाला, हरिभाऊ कुरमे, संजय पतंगे, कृष्णा कुलकर्णी, प्रज्वल मिठावाला, विनोद गांधी, अनिकेत जोशी, मोहम्मद असिफ, प्रवीण हस्तक, श्रीकांत चौधरी आदींचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. क्लोव्हर डेल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी म्युझिकल एरोबिक डान्स, संस्कार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जम्पिंग रोप
सादर केले.
पथसंचलन आणि अन्य उपक्रमात उत्तम सादरीकरण करणारे क्लोव्हर डेल स्कुल, संस्कार विद्यालयाच्या चमुला तसेच परेड कमांडर जावेद खान, एनसीसी टीमला गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट पथसंचलनासाठी पुरुष गटात प्रथम पुरस्कार एनसीसी टीम जेएनईसी, द्वितीय एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, तृतीय पुरस्कार क्लोव्हर डेल स्कुल आणि एनएनएस मेडिकल कॉलेजच्या चमुला तर महिला गटात प्रथम जेएनइसी, द्वितीय एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्स अँड टेक्नॉलॉजी, तृतीय संस्कार विद्यालयाच्या चमुला प्रदान करण्यात आला.
जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ध्रुव देशपांडे, यश इंगळे, वंशिता जोशी, वैष्णवी शास्त्री, श्रावणी चिकलठाणकर या विद्यार्थ्यांनी संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

जेएनईसी प्रवेशद्वाराचे उदघाटन
चार दशकांपासून दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देणारे जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन प्रवेशद्वाराचे स्वातंत्र्यदिनी उदघाटन करण्यात आले. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, अनुराधाताई कदम, कुलगुरू विलास सपकाळ आदी उपस्थित होते.
या महाविद्यालयाच्या उभारणीत अमूल्य योगदान देणारे प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे पदचिन्ह कोनशीलेवर उमटवून अनोख्या पद्धतीने या प्रवेशद्वाराचे उदघाटन करण्यात आले. चिस्तिया चौक ते सेंट्रल नाका मार्गावर असलेल्या या प्रवेशद्वारास ‘प्रताप बोराडे द्वार’ नाव देण्यात आले आहे.