शिक्षणामुळे जगण्याला एक आयाम प्राप्त होतो...
सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये आपलं जगणं हे अवतीभोवतीच्या सर्व घटकांशी जोडलेले असते. शिक्षणामुळे माणसाचे जीवन घडते किंबहुना शिक्षणामुळे जगण्याला एक आयाम प्राप्त होतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मंगेश कश्यप यांनी आज येथे केले.
आज महात्मा गांधी मिशन विद्यापीठामार्फत आर्यभट्ट सभागृहात प्राध्यापक डॉ. मंगेश कश्यप यांचे ‘शिक्षण आणि शाश्वत विकास’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. कश्यप बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
श्री. कश्यप म्हणाले, विकासाला शाश्वत स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक अशा पूर्वसूचना २०३० च्या शाश्वत विकासाच्या आराखड्यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. यामध्ये शाश्वत विकासाची १७ व्यापक उद्दिष्टे देखील निश्चित करण्यात आली आहेत. या दस्तावेजामध्ये शाश्वत विकास साधण्याच्या उद्दिष्टांपेक्षाही अधिक भर समावेशकतेवर देण्यात आला आहे. या १७ उद्दिष्टातील एक उद्दिष्ट म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण होय.
ही उद्दिष्टे स्वीकारताना ‘कोणीच मागे राहता कामा नये’ या तत्त्वाचा स्वीकार करण्यात आला आहे. मानवी आयुष्याच्या सर्व अंगांचा विचार करून, तसेच पृथ्वीवरील विविध प्राणिमात्र आणि निसर्ग यांच्या संरक्षणासाठीचे महत्त्व लक्षात घेऊन या उद्दिष्टांची रचना करण्यात आली आहे. ही उद्दिष्टे पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रत्येक उद्दिष्टाची काही लक्ष्ये ठरवण्यात आली आहेत. एकूण १६९ लक्ष्ये आहेत. ही लक्षे साध्य झाली की नाही, हे मोजण्यासाठी सूचक ठरवण्यात आले असून असे ३०० हून जास्त सूचक नक्की करण्यात आले असल्याची माहिती श्री. कश्यप यांनी यावेळी दिली.
श्री. कश्यप म्हणाले, ही उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. येणाऱ्या काळात आपली ओळख ‘वैश्विक नागरिक’ म्हणून तयार होणार आहे. त्याची सुरूवात झालेली असून या माध्यमातून असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानही श्वाश्वततेत महत्वपूर्ण भूमिका निभावत असून यामध्ये आता चॅट जीपीटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा समावेश झालेला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत असताना आपण यातील आव्हानांना समजावून घेणे गरजेचे आहे.