MGM Foundation day & Building inauguration ceremony
शैक्षणिक क्षेत्रात एमजीएमची कामगिरी अभिमानास्पद
एमजीएमचा वर्धापन आणि विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या उदघाटनप्रसंगी शरद पवार यांचे गौरवोद्गार
मा. श्री शरदचंद्रजी पवार साहेब, मा. श्री राजेशजी टोपे आणि समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा गांधी मिशनचा ३९वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. मा. श्री शरद पवार कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी झाले. यावेळी एमजीएम विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले.
“श्री कमलकिशोर कदम यांची दृष्टी आणि श्री अंकुशरावजी कदम यांच्यासह इतर संस्थापकांची कृती यांच्या संगमातून ३९ वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे रुपांतर एका विशाल वटवृक्षात झाले असून त्याची सावली आज समाजातील अनेक उपेक्षित घटकांना मिळत आहे.” या शब्दांत श्री शरद पवार यांनी एमजीएमच्या वाटचालीचे कौतुक केले. करोना काळात एमजीएम रुग्णालयांनी केलेल्या भरीव कार्याचा उल्लेख करून संस्था महात्मा गांधीच्या विचारांचा वारसा पुढे नेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. औरंगाबादला येण्याची खूप इच्छा असूनही करोनाच्या पार्श्वभूमीवर येणे रद्द करावे याची खंत वाटते असेही ते यावेळी म्हणाले.
नवप्रवर्तन आणि संशोधनासाठी शरद पवारांकडून दोन कोटींचा निधी
देशाच्या विकासासाठी नवप्रवर्तन (इनोवेशन) आणि संशोधन अत्यावश्यक असून एमजीएम विद्यापीठाने त्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा श्री शरद पवार यांनी यावेळी व्यक्ती केली. या कार्यास हातभार लावायला मनापासून आवडेल असे नमूद करून यासाठी एक कोटी रुपयांची देणगी विद्यापीठाला देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. या रकमेतून मिळणाऱ्या व्याजातून नवप्रवर्तन आणि संशोधन क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या एमजीएम विद्यापीठाच्या प्राध्यापकांना शिष्यवृत्ती देण्यात यावी असे ते म्हणाले.
याचबरोबर ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी एखाद्या क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी धडपडत असतील तर त्यांना देखील विद्यापीठाने शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत करावी यासाठी आणखी एक कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
जागतिक स्पर्धेत टिकणारी संस्कारक्षम पिढी घडविणारे विद्यापीठ – श्री राजेश टोपे
कार्यक्रमप्रसंगी श्री राजेशजी टोपे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. “विद्यार्थी केंद्रित, भविष्यवेधी, संशोधनाधारित, मूल्याधारित आणि जागतिक दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या एमजीएमचे राज्याच्या जडणघडणीत आणि प्रगतीत मोठे योगदान आहे” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. आंतरशाखीय आणि वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करून एमजीएम विद्यापीठ बहुआयामी व्यक्तिमत्त्वांच्या निर्मितीस चालना देत आहे. अत्याधुनिक शिक्षणाला कला आणि मुल्यांची जोड देऊन जागतिक स्पर्धेत टिकू शकेल अशी अत्यंत सक्षम आणि संस्कारक्षम पिढी घडवत आहे असेही ते म्हणाले. एमजीएमच्या पुढील प्रवासास सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
दुःखितांचे दुःख जावो
यापूर्वी महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष श्री कमलकिशोर कदम यांनी संस्थेच्या उभारणीत अमुल्य योगदान आणि मार्गदशन दिल्याबद्दल श्री शरद पवार यांचे आभार मानले . महात्मा गांधी मिशनच्या स्थापनेविषयी बोलताना संस्थेचे सचिव आणि एमजीएम विद्यापीठाचे कुलपती, श्री अंकुशराव कदम म्हणाले की, दुःखितांचे दुःख आणि वेदना कमी करणे हा भगवान बुद्ध आणि महात्मा गांधींचा विचार हाच संस्थेचा प्रेरणास्त्रोत आहे. एमजीएम विद्यापीठाच्या स्थापनेविषयी बोलताना नालंदा विद्यापीठाचा उल्लेख करून जगातील सर्व विषय शिकणारे आणि शिकविणारे यांना एकत्र आणणारे एखादे विद्यापीठ आजही असावे या मानसातून विद्यापीठाची स्थापना झाल्याचे ते म्हणाले.
एमजीएम विद्यापीठाची भविष्यवेधी वाटचाल
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ श्री विलास सपकाळ यांनी एमजीएम विद्यापीठातील विविधांगी अभ्यासक्रम आणि तसेच त्यांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. सद्यस्थितीत विद्यापीठात २८१ अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसारख्या अत्याधुनिक विषयांपासून ते पत्रकारिता, चित्रपट निर्मिती, ललितकला, प्रायोगिक कला यांसारख्या विषयांचा यात समावेश आहे असे सांगून या वर्षी एकूण २१८९ विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत असल्याचे ते म्हणाले. यावेळी विद्यापीठाचे पुढील दहा वर्षांचे व्हिजन देखील कुलगुरू यांनी उपस्थितांसमोर मांडले. पुढील काळात जागतिकस्तरीय सहकार्य, उपयुक्त संशोधन तसेच गुणवत्तापूर्ण अध्ययनाच्या त्रिसुत्रीवर विद्यापीठाचा भर असेल ज्यातून २०३० पर्यंत २०० पेटंट प्राप्त करणे, १०० स्टार्ट-अप्सची उभारणी करणे, १००० पब्लिकेशन्स, १ कोटीपर्यंत तंत्रज्ञान हस्तांतर, ५ कोटीपर्यंत शासन प्रायोजित प्रकल्प राबवणे तसेच १० कोटींपर्यंतच्या कन्सल्टंसी सेवा पुरविणे साध्य केले जाईल असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सांगता एमजीएम विद्यापीठातील विद्यार्थांच्या लोककला आणि लोकसंगीतावरील सांस्कृतिक सादरीकरणाने झाली. एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला उपरोक्त मान्यवरांबरोबरच आ. श्री सतीश चव्हाण, आ. श्री विक्रम काळे, खा. श्री इम्तियाज जलील, कृषिभूषण श्री विजय अण्णा बोराडे, एमजीएमचे उपाध्यक्ष, डॉ पीएम जाधव, विश्वस्त श्री प्रतापराव बोराडे, डॉ. सुधीर कदम, डॉ. नितीन कदम, डॉ. उज्वल कदम, एमजीएम आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी, श्री द्वारकाभाऊ पाथ्रीकर, श्री रंगनाथ काळे, श्री भाऊसाहेब राजळे, डॉ. नामदेवराव गाडेकर यांसह इतर सन्माननीय व्यक्ती उपस्थित होते.
हा कार्यक्रम निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत आणि कोव्हिड-19 संबंधी नियमांच्या पालनासह पार पडला.