मानसशास्त्रीय शिक्षण काळाची गरज
माझ्या मुलांनी मला हवे तेच शिकावे, मला हव्या त्याच क्षेत्रात करिअर करावे, असा अट्टाहास बाळगून असणाऱ्या पालकवर्गाचा कल आता काळानुरूप बदलत आहे. करिअर निवडताना आपली आर्थिक स्थिती, आपल्या पाल्याच्या आवडी-निवडी, त्याच्या क्षमता आणि मर्यादा या घटकांबद्दल काही पालक बऱ्याच प्रमाणात स्वतःहून अंदाज बंधतात आणि तो काही अंशी खरा ठरतोही. यामागे अर्थात त्या पालकांची इच्छाशक्ती असतेच परंतु याला मानसशास्त्रीय चाचण्यांची जोड दिली तर अजून अचूकपणे करिअर ची दिशा निवडता येऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून बहुतांश सजग पालक समुपदेशनाची मदत घेत आहेत. ही प्रक्रिया अत्यंत शास्त्रशुद्ध आणि निकोप असते. त्यामुळे मुलांच्या भविष्याची चाहूल आणि त्याच्या क्षमतांची ओळख होऊन निर्णय घेण्यास मदत होते.
आजकाल जवळपास सर्वच वयाची, सर्वच क्षेत्रातील लोक आपापल्या जीवनशैली, ताणतणाव तसेच अन्य गोष्टींसाठी मानसशास्त्रीय सल्ला घेत आहेत आणि याचा त्यांना पुरेपूर फायदा होत आहे. यात समुपदेशन मोलाची कामगिरी बजावते. त्यामुळे बदलत्या काळानुसार मानसशास्त्राच्या सर्व शाखाही व्यापक होत आहेत. बदलती जीवनशैली, दगदग यातूनच स्पर्धा वाढते. तसेच तंत्रज्ञानाधारीत कामकाजामुळे लोकांना आजकाल बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चिंता, काळजी, ताणतणाव आदी समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. यातून मुक्ततेसाठी आपली मानसिक अवस्था सुदृढ असणे आवश्यक असते आणि त्यासाठी आपल्या मदतीला मानसशास्त्र आणि समुपदेशन येऊ शकते. करिअरची दिशा ठरवताना, उद्योगांची उभारणी करताना तर मानसशास्त्राचा आधार घ्यावाच लागतो. याशिवाय, शाळा, दवाखाने, न्यायालय, खाजगी कंपन्या, लष्कर आदी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ असल्याने योग्य कार्य करण्यासाठीही मानसशास्त्राची मदत होते. आता तर काळ इतका पुढे गेला आहे की, जिथे माणूस तिथे मानसशास्त्राची गरज भासू लागली आहे आणि जिथे गरज असते तिथेच संधी असतात. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील या गरजा मानसशास्त्रासाठी रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण करताना आपल्याला दिसून येते.
करिअर निवडताना अभिक्षमता, अभिरुची, व्यक्तिमत्व, बौद्धिक पातळी (IQ), भावनिक बुद्ध्यांकाची पातळी (EQ) या सर्व घटकांचा एकत्रितरित्या विचार करणे खूप आवश्यक असते. बरेच सजग पालक आणि विद्यार्थी करिअर निवडताना समुपदेशकांची मदत घेतात. आपल्याकडे फॅमिली डॉक्टर्स ही संकल्पना खूप रूढ आहे त्याच धर्तीवर आता विदेशात फॅमिली कौन्सेलर किंवा फॅमिली थेरपिस्ट असतात. लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला व्यावसायिक समुपदेशनाची (Professional Counselling) गरज असते. म्हणूनच काळाची गरज लक्षात घेता मानसशास्त्र या विषयात दिवसेंदिवस करिअरच्या खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत.
फक्त सल्ला देणे म्हणजे समुपदेशन नव्हे. अगदी बारीकासरीक ते मोठ-मोठ्या समस्यांसाठी समुपदेशक व्यवसायिकरित्या मदत करतात. ट्रॉमा, अब्युज, डिप्रेशन, एनक्झायटी/ फोबिया (भीती), ओसीडी आणि इतर मानसिक त्रासांसारख्या अनेक गंभीर बाबींबद्दल सामान्य लोकही अशास्त्रीय सल्ले देताना दिसतात. त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. हे काम मुख्यत्वे व्यवसायिक समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ञांचे असते. आपल्या समस्येची नीट उकल करून ते त्यावर मार्गदर्शन करत असतात. निदान करण्यासाठी व्यक्तीच्या मानसिकतेच्या पूर्वस्थितीचा आढावा घेतला जातो. त्यानंतर चाचणी करून त्यातील निष्कर्षानुसार उपचारपद्धती निश्चित केली जाते. हे सर्व तज्ञांच्या साहाय्याने करून घेणेच आवश्यक असते. त्यामुळे या क्षेत्रात प्रवेश करायचा असल्यास योग्य शिक्षण, अनुभव आणि स्वतःची कौशल्ये यांची गरज असते. आपण योग्य शिक्षण घेतल्यास नक्कीच या क्षेत्रात मोठी झेप घेता येऊ शकते.
आजच्या काळात मानसशास्त्र आणि तत्संबंधी शिक्षण देणाऱ्या देशभरात अनेक संस्था आहेत. विशेष म्हणजे, आता मराठवाड्यात एम.जी.एम. विद्यापीठाने यासंबंधी स्वतंत्र विभाग सुरू करून अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. येथे बी.ए. ऑनर्स, एम.ए क्लिनिकल सायकॉलॉजी आणि पीएच.डी हे अभ्यासक्रम नुकतेच सुरू करण्यात आले आहेत. ज्यांचा आजवर मानसशास्त्राशी काही संबंध आला नाही मात्र, याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे अशा व्यक्तीही पीजी डिप्लोमा इन गायडन्स अँड काऊन्सेलिंग या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. मात्र, पुढील करिअरच्या दृष्टीने यातील पदव्यूत्तर शिक्षण आणि अनुभव अधिक प्रभावी ठरतो. या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्यातही आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार आपल्याला स्पेशलायझेशन करता येते. यात अनेक उपशाखा आहेत. क्लिनिकल सायकॉलॉजी, काऊन्सेलिंग सायकॉलॉजी, इंडस्ट्रीयल सायकॉलॉजी, फॉरेन्सिक सायकॉलॉजी, स्पोर्टस सायकॉलॉजी, एज्युकेशनल सायकॉलॉजी, एक्सपेरीमेंटल सायकॉलॉजी, क्रिमीनल सायकॉलॉजी, कंज्यूमर सायकॉलॉजी इत्यादी शाखांमधून आपण शिक्षण घेऊ शकतो. आपल्या आवडीचा विषय निवडून त्यात करिअर करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तर होईलच, त्या बरोबरच ते रोजगारक्षमही बनू शकतील.
मानसशास्त्रात करिअर करू इच्छित असल्यास ऑनर्सचा अभ्यासक्रम जास्त फायद्याचा ठरतो. कारण, मानसशास्त्राच्या पायाभूत शिक्षणासोबत यात प्रात्यक्षिकांवरही खूप भर असतो. शिवाय, प्रात्यक्षिक म्हणूनही मानसशास्त्राचा आणि वैकल्पिक (Elective) म्हणूनही मानसशास्त्राचाच विषय निवडता येतो. त्यानंतर ऐच्छिक इंटर्नशीप केल्यावर आपल्यासाठी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, काऊन्सेलर, स्कूल सायकॉलॉजिस्ट, स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट, इंडस्ट्रीयल सायकॉलॉजिस्ट, मॅरेज आणि फॅमिली काउन्सेलर आदी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी निर्माण होतात. आगामी काळात मानसिक आरोग्य सेवांची खूप गरज भासणार आहे. भविष्यात सरकारी तसेच खाजगी आरोग्य सेवा अधिक व्यापक करण्यासाठी मानसिक आरोग्यसेवाही तितकीच बळकट करावी लागणार आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीनुसार अत्यंत प्रभावी ठरत असलेल्या क्षेत्रांपैकी एक अशा या ‘मानसशास्त्र’ क्षेत्राकडे युवावर्गाने नक्कीच वळायला हवे.
आर्या तेंडुलकर,
मानसतज्ञ,
सहाय्यक अध्यापिका,
मानसशास्त्र विभाग, एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद.